Thursday, July 15, 2010

Youth Fellowship Annual Event

युथ फेलोशिप वार्षिक समारंभ

- आमोद वैद्य

तारिख - शनिवार दि. २६ जुन, २०१०

स्थळ - कन्व्हेंशन सेंटर, न्यु कॅम्पस, टाटा सामाजिक विज्ञान संस्था, देवनार बस डेपो समोर, मुंबई-४०००८८

वेळ - १) संशोधन प्रकल्पांचे प्रदर्शन दुपारी ३:३० ते ५:३०
        २) पदवी प्रदान समारंभ सायंकाळी ६ ते ७:३०

प्रमुख पाहुणे - श्रीमती शबाना आझमी, अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्ती

समारंभाचा अहवाल -

आमचा संघ निवडला गेला ह्या आनंदात आम्ही सर्व जण होतो. पुढील वर्ष कसे असेल, कशा प्रकारे शोध विषय निवडायचा ह्या विचारात आम्ही होतो. अशातच आनंदच्या नावे पोस्टाने एक निमंत्रण पत्र आले. पुकार कडुन ते निमंत्रण होते. मागिल वर्षीच्या 'फेलोज' नी वर्षभर केलेल्या संशोधन प्रकल्पांचे प्रदर्शन व पदवी प्रदान समारंभ होता. संपुर्ण संघाला घेऊन या असेही त्यात म्हटले होते.

या द्वारे संपुर्ण संघाला 'पुकार युथ फेलोशीपची' एक तोंडओळख होईल. अनेक विषय, समस्या कळतील व त्यावर त्या त्या संघाने कशाप्रकारे काम केले आहे, ते करताना त्यांना कोण कोणत्या अडचणी उद्भवल्या याची पण माहिती होईल. हा उद्देश मनाशी बाळगुन मी, आनंद, मनिषा, अखिल, योगेश, चंदा व शारदा सुमो गाडीने ईच्छित स्थळी दुपारी ठिक २:३० वाजता पोहचलो.

कन्व्हेंशन सेंटर च्या बाहेरिल जागेत सर्व संघांनी आपआपले संशोधन प्रकल्प व त्याविषयाचे माहितीपर लेख, चित्र-फित, ध्वनी-फित स्वतंत्र टेबलावर मांडुन ठेवले होते. आतमधे शिरताना आमच्या संघाला कोणतीच अडचण भासली नाही कारण सर्व ठिकाणी अपंगाना येण्या-जाण्यासाठी सोयीस्कर रॅम्प्स, लिफ्ट्स ची सोय होती. इतकेच नव्हे तर खास अपंगासाठी स्वतंत्र शौचालय होते.

आम्ही पहिल्या टेबला पासुन सुरुवात केली. एकमेकांची ओळख करुन घेऊन आम्ही त्यांना त्यांच्या प्रकल्पा विषयी विचारले. असे करत प्रत्येक टेबलावर जाऊन त्या त्या संघाच्या प्रकल्पाविषयी माहिती करुन घेत होतो. कोणी नवरा-बायको च्या नाते संबंधावर शोध घेतला होता, कोणी अपंग पाल्याच्या पालकांच्या मानसिकतेवर, कोणी मैत्री या विषयावर, कोणी महिलांचे राजकारणातील स्थान, कोणी माहिती अधिकार व त्याचा प्रचार, तर कोणी कुराणामधे असलेले महिलांचे स्थान.

कवितेचा वापर करुन सादर केलेला एक
शोध प्रकल्प
उत्सुकतेने शोध प्रकल्पा विषयी माहिती
करुन घेताना माझा संघ

अपंग पाल्याच्या पालकांची मानसिकता
हा शोध प्रकल्प असणारा आकांक्षा ग्रुप
साप-शिडीचा वापर करुन सादर केलेला
एक शोध प्रकल्प
कित्येक संघांनी त्यांचे प्रकल्प अतिशय सुरेख पद्धतीने दर्शविले होते. कोणी साप-शिडीच्या खेळाचा वापर केला होता, कोणी ध्वनी-फित ऐकवित होते तर कोणी माहितीपर लेख असलेले कागदं देत होते. अशारितीने हे सर्व प्रकल्प बघता बघता २:३० तास कसे निघुन गेले त्याचा पत्ताच लागला नाही. सर्वच जण दमले होते म्हणुन थोडी विश्रांती घेण्याचे आम्ही ठरवले. चहाचा आस्वाद घेत आम्ही तिथे चाललेल्या प्रदर्शनाचा आनंद घेत होतो.
सर्व शोध प्रकल्प बघुन झाल्यावर
थोडी विश्रांती घेताना
शबाना आझमी
इतक्यात प्रमुख पाहुणे शबाना आझमी यांचे आगमन झाले. येताच त्यांनी सर्व संघांची व त्यांच्या प्रकल्पांची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली व चौकशी केली. यानंतर आम्हा सर्वांना विनंती करण्यात आली की आम्ही सर्वांनी सभागृहात जाऊन बसावे.

आमच्या संघाला सोयिस्कर पडावे म्हणुन आमच्या सर्वांची बसण्याची सोय पहिल्या रांगेत केली गेली. सर्वप्रथम पुकारच्या कार्यकारी संचालक डॉ. अनिता पाटील-देशमुख यांनी सर्वांशी संवाद साधला. यानंतर शबानाजी यांना व्यासपिठावर आमंत्रित केले व त्यांचा पुष्प-गुच्छ व भेट-वस्तु देऊन सत्कार करण्यात आला. शबानाजी यांनी उपस्थित युवकांशी संवाद साधताना सांगितले की कुठल्याही देशाची खरी संपत्ती म्हणजे युवा पिढी. परंतू त्या युवा पिढीला योग्य दिशा देणे व सुजाण नागरिक बनविणे हि काळाची गरज आहे. त्यादृष्टीने पुकार ही संस्था हे काम उत्तमरित्या पार पाडत आहे.
पहिल्या रांगेत बसलेला माझा संघ
यानंतर प्रत्येक गटातील एकेका सदस्याला व्यासपिठावर आमंत्रित करुन शबानाजींच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. मागील वर्षीचे 'फेलोज' यास्मिन शेख, हर्षद जाधव यांनी त्यांच्या शोध प्रकल्पा दरम्यान आलेले अनुभव कथन केले. अशाप्रकारे कार्यक्रमाची सांगता झाली.
हर्षद जाधव आपले आनुभव सांगताना
घरी परतताना आमच्या मधे एक नविन उत्साह, नविन चैतन्य निर्माण झाला होता. प्रत्येकाच्या मनात काहितरी वेगळं काहितरी नविन करुन दाखविण्याची उमेद निर्माण झाली होती. मागिल वर्षीच्या सर्व संघांच्या संशोधन प्रकल्पांचे प्रदर्शन आयोजीत करुन त्या प्रदर्शनाला चालू वर्षीच्या संघांना आमंत्रीत करण्याची पुकार ची पद्धत अगदी योग्य आहे असे माझे ठाम मत आहे. या पद्धतीमुळे चालू वर्षीच्या संघांना एकंदर 'युथ फेलोशीप प्रोजेक्ट' विषयी थोडीफार माहिती व अनुभव ऐकायला मिळतात.

मागील वर्षीची 'फेलो' यास्मिन शेख आपले अनुभव सांगताना -